चर्चबेल - ग्रेस
'चर्चेबल ' हा मराठी कवी माणिक गोडघाटे उर्फ ग्रेस यांचा पहिला लघुनिबंध संग्रह होय. इसवी सन 1974 मध्ये त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. या संग्रहात पस्तीस लेख आहेत. त्यापैकी 34 लेख नागपूरच्या 'तरुणभारत ' च्या साप्ताहिक आवृत्तीत प्रसिद्ध झालेले आहेत .
आत्मपर आशय असूनही भावमधुर काव्याची प्रचिती देणारे लेख या संग्रहात आहेत. 'चर्चबेल ' मध्ये ग्रेसच्या अन्य कवितांच्या तुलनेत अधिक सुगमता आहे. आणि लक्षपूर्वक वाचल्यास कवी ग्रेस समजून घेण्यासाठी त्यांचे दलित लेख फारच महत्त्वाचे ठरतील हे लक्षात येते. हे सर्व लेख केरळच्या किनाऱ्यावर असलेल्या चर्च, वसतिगृह, रुग्णालय आणि केरळच्या सभोवतालचा निसर्ग यांच्या सानिध्यातील अनुभव विश्व मांडणारे आहे.
कवी ग्रेस यांना मर्ढेकरोत्तर नवकवी असे संबोधले जाते. कविता आणि ललितलेखन या साहित्य प्रकारांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण काम केलेले आहे. चर्च बैल या ललित लेख संग्रहात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आपल्याला आढळून येतात. त्यांचे अधिव्याख्याता हे व्यक्तिमत्व तसेच माध्यम स्नेही असलेले त्यांचे कार्यक्षेत्र त्यांच्या दृकश्राव्य प्रतिमा निर्मितीमधून डोकावताना दिसते.
'चर्चबेल' मधील सर्कस, तांदूळ मोजणाऱ्या मुली, बाहुलीचा मृत्यू, आकांताचे देणे, घोडा, रोशनची गाणी, टेकडीवरील पाऊस आणि भावे, एक ऑस्ट्रेलियन स्वगत, वेल्लोर हॉस्पिटल आणि एलिनॉर, प्रीस्ट- प्रार्थना आणि पियानो, ज्यासी आपंगिता नाही, त्वचा आणि तंतू, फ्युनरल ट्रेन या सर्व लेखांच्या शीर्षकांवर नजर टाकल्यास साध्या घटनांभोवती गुंफलेले भावविश्व सहज अवतरते. अस्वस्थ करणाऱ्या आणि व्याकुळ अवस्थेतील घटनांचे, विचारांचे रूप व्यक्त होते. या लेखसंग्रहातील भावभावनांचा अविष्कार व्यापक चिंतनातून व्यक्त झालेला आहे.
ग्रेस यांच्या ललित संग्रहातून 'मी' चे एक भावजीवनच प्रकट होते. किंबहुना 'मी' च्या भावजीवनाशी एकरूप झालेल्या व्यक्ती आणि घटना आल्या आहेत. भारतीय संस्कृतीतील व पाश्चात्य व्यक्तिरेखांशी या व्यक्ती व आठवणी संबंधित आहे. अत्यंत संवेदनशीलतेने या सर्व आठवणी लिहिल्या आहेत. 'मी ' पणाची जाणीव होते आणि 'मी' सभोवती दाटून येणाऱ्या आठवणी गोळा करताना आठवणींचे स्वतंत्र रूप अतिशय महत्त्वाचे आहे. भावजीवन, त्यातील करुनीचा स्त्रोत, तुकारामांच्या कवितेतील आर्तता, दुःखालाही कोळून पिण्याचे सामर्थ्य, या सगळ्या गोष्टीत 'मी' चे एक रूप दिसते. काव्यमय भाषेत बोलणारा हा कवी ललित गद्यातही तसाच अवतरतो. मग कवितेतील आणि ललित गद्यातील अंत: स्वर एकच बनल्याचे ठळकपणे जाणवत राहते.
ग्रेस यांना जीवनात सर्वच स्तरावर म्हणजे कौटुंबिक,आर्थिक,भावनिक, सामाजिक अशा अनेक स्तरांवर संघर्ष करावा लागला. त्यांनी तो समर्थपणे आणि मानीपणाने केलाही. गरीबीपेक्षाही आईचा मृत्यू, त्यातून आलेले मातृवियोगाचे दुःख त्यांना प्रकर्षाने विव्हळ करत आहे. मातृ प्रेमासाठी असावलेले त्यांचे मन त्यांच्या ललिता लेखनातून व कवितेतून ठायी ठायी भेटते.
माणसांच्या मायेवाचून जगावे लागणारे आयुष्य एकाकी असताना असलेला मायेचा आधारही हरवला, या आत्मदुःखात आणि आत्मवंचनेत मीचे एकाकी आयुष्य उरते. 'स्व' चा जन्म आईच्या कुशीतून होतो. मग बाप कुठे हरवतो? जन्ममरणाची ही कल्पना व्यापक अर्थाने उरते. खरे दुःख आईच्या असण्या -नसण्याचेच आहे . आईचे प्रेम न मिळाल्याची खंत व्यक्त होत राहते. आईने प्रेम केले की नाही, यापेक्षा आई ही 'आईच' असते. ही भावना येथे अधिक महत्त्वाची वाटते. 'उन्हातील आई ' मध्ये ग्रेस म्हणतात, ' कधी माझ्या आईने मला प्रेमाने जवळ घेतले नाही, की माझ्या अंगाईत खडीसाखर पेरली नाही. यासंबंधी माझी तक्रार नाही '.
ग्रेस यांचा विवाह केवळ दोन मित्रांच्या साक्षीने झाला. पण वैवाहिक जीवनातील आनंदही त्यांना दीर्घकाळ लाभला नाही. त्यांच्या पत्नी सतत आजारी असत. ( लीला ताई ). त्यातच त्या ग्रेसना एकटेपणाचे आणखी दुःख देऊन स्वर्गवासी झाल्या. मिथिला, माधवी या त्यांच्या दोन मुली आणि एक मुलगा राघव. पत्नीच्या मृत्यूनंतर ग्रेस यांनी तिन्ही मुलांना 'आईच्या' मायेने वाढविले. त्यांच्या ललिता निबंधातून या मुलांचा उल्लेख आला आहे.. कवी ग्रेस हे कुटुंब वत्सल आहेत, प्रेमळ, हळवे आहेत हेच यातून जाणवते.
कवी ग्रेस यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी झाली याबद्दल स्वतः ग्रेस म्हणतात, '' माझ्या जडणघडणीवर फक्त माझ्या आईचा व ईश्वराचाच परिणाम झाला आहे. व ही परिणाम- प्रक्रिया मला शेवटची नीज येईपर्यंत अखंड सुरू राहणार ". परंतु ज्या परिस्थितीत आणि आजूबाजूच्या वातावरणात माणूस वाढतो, वावरतो, जगतो, त्या वातावरणाचा, क्रिया- प्रतिक्रियांचा आणि भेटणाऱ्या व्यक्तींचाही परिणाम मानवी मनावर होतच असतो. अशा अनेक व्यक्तींचा उल्लेख 'चर्चबेल' मधून आला आहे. उदा. डॉक्टर थॉमस, फादर ग्रीन, नेपाळी, बाहुली, एलीनॉर, इत्यादी. कवी आणि लेखक यांचेही वाचन, त्यांचे चिंतन -मनन सुद्धा , त्यांचे विचार आणि व्यक्तिमत्व घडविण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे व्यक्तीत्वाची जडणघडण होताना वरील गोष्टीही अपरिहार्यपणे विचारात घ्याव्या लागतात. 'चर्चबेलच्या ' आवरणावर 'चर्चबेल 'बद्दल लिहिताना जो मजकूर छापला आहे, त्यामध्येही 'तुक्याच्या अभंगवाणीवर पोसलेले, रोशनच्या गाण्यांनी समृद्ध झालेले, हॉस्पिटल मधल्या प्रदीर्घ वास्तवामुळे मृत्यू विषयी अधिक प्रगल्भ विचार करणारे, माणसा माणसातील स्वभाववैचित्रावर व व्यक्ती वैशिष्ट्यांवर लोभाळून जाणारे, झाडे आणि घोडे, यांच्यामुळे वेडावलेले ग्रेसचे कवी मन आणि त्यांचे समृद्ध भावविश्व रसिकांसमोर एखाद्या स्वच्छ, नितळ, पारदर्शक जलाशयासारखे पसरलेले आहे.
ग्रेस यांच्या कवितांतून, ललितनिबंधातून अनेक वांग्मयीन व्यक्तिमत्वे, चित्रपटातील व्यक्तिमत्वे, पाश्चात्य वाङ्मयातील व्यक्तिमत्वे, अभिनेते, अभिनेत्री यांचा उल्लेख येतो. उदा. जी. ए, तुकाराम, नूर जहा, रिलके, डब्ल्यू एस लॉरेन्स, गोविंदाग्रज इत्यादी.... याचा अर्थ त्यांच्यावर त्या त्या व्यक्तींचा, व्यक्तिमत्त्वांचा, त्यांच्या लेखनाचा, अभिनयाचा, मतांचा परिणाम ग्रेस यांच्यावर झाला आहेच. ज्ञानेश्वर, तुकाराम, महानुभाव पंथ , रामदास,कबीर, जनाबाई यांचे संदर्भ त्यांच्या लेखनातून येतातच. त्यांच्या भावविश्वात ज्या ज्या व्यक्तींना अ ढळ स्थान आहे, अशाही व्यक्तींचे उल्लेख, संदर्भ त्यांच्या लेखनातून आढळतात.
ग्रेस यांच्या एकूण लेखनात अध्यात्म वृत्तीचे भान प्रकट होते. चैतन्याचा प्रवाह वाङ्मयातून उतरत राहतो. धर्म आणि जागृती यांचे एक रूप 'चर्चेबल' मधून व्यक्त होते. ख्रिश्चनांच्या चर्चची घंटा म्हणजे चर्चेबल. 'चर्चबेल' मध्ये ख्रिश्चनांच्या चर्चची घंटा प्रामुख्याने आलेली आहे. चर्च आणि ग्रेस यांच्यातील नातेसंबंधही खूपच वेगळे आहेत. त्यांच्या ललित लेखनात अनेक आठवणी व्यक्त होतात . मग त्या व्यक्तीपासून निसर्गापर्यंत आणि आवडत्या वांग्मयीन कलाकृतीपर्यंत अनेक पद्धतींचे ललित लेख यात व्यक्त होतात. स्वतःचे अनुभव, भावस्थिती आणि व्यक्तिमत्त्वाची उत्क्रांती हेच ललितगद्याचे आत्मा विष्काराचे रूप आहे. ही चर्चबेल झरझरत मूळ दुःखाच्या प्रवाहाजवळ जाऊन पोहोचते. काँग्रेस यांच्या लेखनात दुःखाचा बरोबरीनेच अवतरला आहे. वेदनांच्या जगण्या -भोगण्याच्या यातनांचा डोह सावरत बोलणाऱ्या आणि अस्तित्व टिकवून असणाऱ्या या व्यक्तिरेखा महत्त्वाच्या आहेत.
चर्चबेल मधील 'लिली' म्हणजे अस्वस्थ काहूर आणि अस्वस्थ जगणे असलेली व्यक्तिरेखा. तिच्याबद्दलच्या एकूण संवेदनांची मांडलेली ही भूमिका एकूण स्त्री प्रतिमांचे वेगळेपण व्यक्त करणारी अशा स्वरूपाची आहे. 'उन्हातली आई' मध्ये भेटणारी आई, 'कंदील' मधून भेटणाऱ्या मुकी मनी सुखीया आणि पांगळी राजम्मा,'' देवी' मधून व्यक्त होणारी आणि बंधुजींच्या नाजूक संबंधात हरवून गेलेली देवी, वेडेपण आणि हरवलेलं भविष्य उशाशी कवटाळणाऱ्या 'तांदूळ वेगळ्या मुली ', जीवाला चटका लावून जाणारी 'बाहुली ', 'वेल्लोर हॉस्पिटल आणि एलीनॉर,', नूर जहाचे उलगडणारे व्यक्तिमत्व, तारायंत्रांच्या खांबातून डोकावणारी डिंपी, हॉस्पिटल मधील एकांतात भेटणारी परिचारिका (नर्स), 'उरलेला चंद्र' मधून भेटणारी विराणी भट्टाचार्य नावाची मुलगी, 'ज्यासी आपंगीता नाही ' मधून भेटणारी सखी इत्यादी व्यक्ती रेखा या व त्यांच्या चित्रणातून ग्रेस यांच्या 'मी' चे अनेक पैलू उलगडत जातात.
मराठीतील संत- पंत- तंत साहित्य, सुफी तत्त्वज्ञान, आणि काही महत्त्वाचे पाश्चात्त्य कवी यांचे वाचन ग्रेस यांनी अभ्यासपूर्वक, चिंतन मनन पूर्वक केल्याचे जाणवते. या शिवाय त्यांच्या कवितेतून , ललित निबंधातून, उर्दू शेर शायरी, हिंदी चित्रपट गीते, हिंदी उर्दू गझला, यांचाही उल्लेख खूपच अधिक्याने येतो. या सर्व साहित्य प्रकारांबरोबर टागोर, एमिली डिकन्सन, ज्ञानेश्वर, तुकाराम इत्यादी कवी , संत लेखक यांच्याही वाङ्मयाने ग्रेस यांची विचारसरणी आणि प्रतिमा समृद्ध व सुसंस्कृत झाली आहे. या सर्वांचा प्रत्यय चर्चबेल मध्ये येतो.
Comments
Post a Comment