परिपूर्ती-डॉ. इरावती कर्वे

 1. परिपूर्ती या ललित गद्यसंग्रहात इरावती कर्वे यांनी स्त्री जीवनावर भाष्य केले आहे स्पष्ट करा.

इरावती कर्वे या सुप्रसिद्ध मानव वंश शास्त्रज्ञ आणि लेखिका आहेत. इरावती कर्वे यांचे परिपूर्ती हे ललित निबंधाचे पुस्तक 1949 मध्ये प्रकाशित झाले. परिपूर्ती मध्ये एकूण 18 निबंध समाविष्ट केलेले आहेत. विषयानुरूप आणि प्रसंगोपात भावभावना आणि चिंतनशीलता यांचा मुक्त गोफ इथे दिसतो. त्यामुळेच व्यक्तीचित्रणे,अनुभवकथन, कथात्म चित्रण आणि तीव्र विचारात्म लेखन इथे एकत्रितपणे पाहता येते. त्यांच्या प्रत्येक लेखात त्यांचे व्यासंग विषय म्हणजे समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, प्राचीन संस्कृती, आधुनिक जीवनपद्धती या ना त्या रूपात प्रकट झालेले दिसतात. या संग्रहात प्रेमाची रीत, वेड लागलेले घर , जन्मांतरीची भेट, स्त्री व संस्कृती, बीज -क्षेत्र, मारी कुट्टी, गौराई, एकेश्वरी पंथाचा विजय, जुळी मुले, स्त्री राज्य, मराठ्यांचा मोठेपणा , महार आणि महाराष्ट्र, दिक्काल, नव कलेवर, एक प्रयोग, सुप्त इच्छा, वाटचाल, परिपूर्ती हे लेख समाविष्ट आहे.

लेखिका इरावती कर्वे स्वतः घेतलेल्या अनुभवाविषयी चिंतन करतात. यातील बऱ्याच लेखांमध्ये स्त्रियांविषयी लेखन केलेले आहे. स्त्रियांचे अस्तित्व, तिची सुखदुःख, तिच्या भावभावना याविषयी लिहिले आहे. लेखिकेचे व्यासंगी व्यक्तिमत्व आपल्याला सर्व क्षेत्रात दिसते. परंतु आपल्या ज्ञानाविषयी, व्यासंगीपणाविषयी लेखिकेच्या मनात जराही अहंकार दिसून येत नाही. परिपूर्ती या संग्रहातील बहुतेक लेखांना नाटकीपणा नव्हे तर नाट्यात्मकता लाभली आहे. इरावती बाई आपला अनुभव सच्चेपणाने व्यक्त करतात त्यामुळे एक राकट, दणकट, खंबीर आकार त्यांच्या लघु निबंधाला प्राप्त झाला आहे.


हिरावती बाईंनी आपल्या ललित गद्यसंग्रहात स्त्री जीवनाचा वेध घेतला आहे. आपल्या देशात बऱ्याच स्त्रियांना स्त्री म्हणून दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. त्यांना पुरुषांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते. अजूनही या परिस्थितीत म्हणावा तितका बदल झालेला दिसत नाही. स्त्री मुक्तीसाठी त्यांना स्त्री व पुरुष या दोन्ही वर्गाकडून मदतीची अपेक्षा आहे म्हणून त्या म्हणतात, " स्त्रियांची चळवळ ही काही स्वतंत्र चळवळ नाही. सामाजिक अन्याय खाली दडपलेल्या मानवाची सुटकेसाठी जी चळवळ चालली आहे, त्याचाच एक भाग म्हणून स्त्रियांच्या चळवळीकडे बघायला हवे ". बाईंच्या मते स्त्रियांना सावलीतील वनस्पती म्हणून जपणे नको, की उपभोग्य वस्तू म्हणूनही त्यांच्याकडे बघणे नको. तर एक स्त्री म्हणून तिला सन्मान मिळणे महत्त्वाचे आहे. मात्र बाईपणाचा फायदा घेऊन कोणतेही हक्क मिळवणे हे देखील त्यांना पसंत नव्हते. त्यांच्या ललित गद्य लेखनात जे स्त्री विषयक लेख आलेले आहेत त्यांचा थोडक्यात आढावा घेऊ.

1. जन्मांतरीची भेट :- आपल्या समाजात स्त्रियांवर पूर्वीपासून अनेक बंधने लादलेली दिसतात. प्रथा, परंपरा, संस्कृतीच्या नावाखाली त्याची जोपासना होताना दिसते. आपल्या समाजात परंपरांना महत्त्व असल्याने आजही त्यात म्हणावा तितका बदल झाल्याचे दिसत नाही. पूर्वीपासून चालत आलेल्या कल्पना आजही खोलवर रुजलेल्या दिसतात. त्यातलाच एक भाग म्हणजे पती शिवाय स्त्रीचे जीवन निरर्थक मानले जाताना दिसते. पुरुषांशिवाय स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व बऱ्याच प्रमाणात नाकारलेले दिसते. विधवा स्त्रीला समाजात, कुटुंबात मानाची वागणूक मिळत नाही. पूर्वीच्या काळी पतीचे निधन झाल्यावर त्या स्त्रीला सती जावे लागेल. त्याही पूर्वी पतीचे निधन झाल्यावर त्या स्त्रीला त्याच्यासोबत जिवंत पुरले जात असावे, असा पुरावा इरावती बाईंना मानव वंशशास्त्राच्या संशोधनासाठी उत्खनन करताना सापडला. तेव्हा इरावती बाईंच्या मनात जे विचार आले, त्यातून या लेखाने आकार घेतलेला आहे. गुजरात मध्ये संशोधनाचे काम करण्यासाठी डॉ. साकलिया, इरावती बाई आणि इतर सहकारी मानव मावशी शास्त्राच्या उत्खननासाठी गेलेले असतात. त्या उत्खननात त्यांना तरुण पुरुषाचा, कुत्र्याचा आणि शेवटी स्त्री देहाचा सांगाडा मिळतो. छाननी केल्यावर इरावती बाईंच्या लक्षात येते की, ती फारच तरुण स्त्री असावी. त्या तरुण स्त्रीला अंधश्रद्धेमुळे, परंपरेमुळे जबरदस्तीने बळी जावे लागले असणार. या विचाराने त्यांचे संवेदनशील मन पिळवटून जाते. त्यांचे दुःखी स्त्रीमन पंधरा हजार वर्षांपूर्वीच्या स्त्री सांगाड्याला आर्ततेने साद घालते की, ' तू ती मीच का गं ? तू ती मीच का ग? एकंदरीत या लेखात इरावती बाईंनी स्त्री जीवनाचा वेध घेतला आहे.


2. स्त्री व संस्कृती :- स्त्रियांच्या मनात संस्कृती खोलवर रुजलेली दिसून येते. आपल्या संस्कृती चांगल्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर काही गोष्टींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी संस्कृतीची जोपासना करताना स्वतंत्रपणे विचार करणे, योग्य निर्णय घेणे गरजेचे असते. शेवटी संस्कृती ही मानवी जीवन सुखकर करण्यासाठीच असते. मात्र माणसे सुखकर जीवनापेक्षा रूढी-परंपरांनाच चिकटून बसलेले दिसतात. त्यामध्ये बदल केलेला बऱ्याच माणसांना चालत नाही. मग ते सुशिक्षित असो, की अशिक्षित. म्हणूनच सर्वच शिक्षित लोक संस्कृत असतात, यावर इरावती बाईंचा विश्वास नाही. या संदर्भात त्यांना आलेले अनुभव या लेखात आलेले आहेत. नवऱ्याने बायकोला मारणे, ही जणू सामान्य जनरित असल्याचे आपल्याकडे मानले जाते. मात्र अमेरिकेत राहुल आलेले एक वयस्कर गृहस्थ हे पाहून म्हणतात, '' हिंदुस्थानातले पुरुष सुसंस्कृत कधी होणार? ". या प्रश्नाचे उत्तर इरावती बाई देत नाहीत. कारण सुसंस्कृत काय? असंस्कृत काय? कोण सुसंस्कृत ? याबद्दल त्यांना उमजच पडत नाही. या संदर्भात त्यांना एक उदाहरण आठवते. नवऱ्याने बायकोवर रुबाब न करणे, त्यांना न मारणे म्हणजे नवऱ्यात काहीच तडफ नाही. असे काही बायका मानतात. शिकलेल्या तरुणींचा हा अविचारी दृष्टिकोन बघून इरावती बाई अस्वस्थ होतात. शिकलेल्या तरुणांनी पारंपारिक प्रथांबद्दल तटस्थपणे, स्वतंत्रपणे, वैचारिक पातळीवर विचार करू नये याचे इरावती बाईंना दुःख वाटते. त्यामुळे सुसंस्कृत कोणाला म्हणावे? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.

3. बीज क्षेत्र :- बऱ्याच कुटुंबात सासू - सून यांचे संबंध ताणलेले असतात. त्यांच्यात एकमेकींबद्दल आदराची भावना नसते. एकमेकींना समजून न घेतल्याने दुरावा वाढतो. त्यामुळे रुसवे -फुगवे, राग -द्वेष वाढत जातात. कधी कधी या गोष्टी टोकाला गेल्याचे दिसतात. असाच एक अनुभव या लेखात इरावती बाईंनी मांडला आहे. त्यांची लेक मैना नवरा व सासू यांच्या त्रासाला कंटाळून घरी आलेली असते. त्यातील एक कारण म्हणजे मैना मुलाला पाजत असते. तेव्हा तो एकदम उसळी मारतो. आणि त्याचे डोके भिंतीवर आदळते. त्यामुळे सासुबाई तिला खूप बोलतात आणि नवरा मारतो. जणू काही वहिनीला तिच्या मुलाची काहीच काळजी नाही, असाच भाव त्या दोघांच्या चेहऱ्यावर असतो. मैनाचा तिच्या मुलावर काही अधिकार नाही, असे सासूबाई मानत असल्याने त्या तिला म्हणतात,'' कुठचा तुझा पोर ? तुला आम्ही आमच्या कुळाच बीज रक्षण करायला दिलं. तुला खायला घातलं, त्या अन्नावर तो पोचला. पहिल्यांदा आत पोसलस, आता बाहेर पोसते आहेस. दाई ती दाई आणि वर मीजास पहा! बीजक्षेत्र न्याय हे दुधारी शस्त्र आहे. बीज म्हणून मूल बापाचे व क्षेत्रावर हक्क सांगून क्षेत्रात जे उगवले तेही क्षेत्राच्या मालकाचे. म्हणजे मातृत्व ही एक नैसर्गिक घटना आहे, तर पितृत्व हा एक सामाजिक संकेत आहे. मात्र आपल्या समाजात नैसर्गिक घटनांपेक्षा सामाजिक संकेतांनाच जास्त प्राधान्य दिले जाते. म्हणजेच काही स्त्रिया दुसऱ्या स्त्रियांना कमी लेखतात. त्यांच्या मातृत्वाचा, स्त्रीत्वाचा अपमान करतात. आणि तिचे जीवन गुंतागुंतीचे, मुश्किल करून टाकतात. ही गोष्ट किती शोचनीय आहे . यावर इरावती बाईंनी प्रकाश टाकला आहे .


4. गौराई :- अनेक स्त्रियांमध्ये नेतृत्व गुण असतात. आपल्या हुशारीने, खंबीर वृत्तीने, प्रेमळ स्वभावाने, समजून घेण्याच्या प्रवृत्तीने त्यांनी कुटुंबात, समाजात स्वतःचे असे महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केलेले असते. अशाच काही मुलींचा आणि स्त्रियांचा वेध या लेखात इरावती बाईंनी घेतला आहे. इरावती बाई ची मुलगी गौरी ही इतर मुलांना आपल्या म्हणण्याप्रमाणे वागायला लावते. त्याचबरोबर त्यांच्यावर प्रेम करते आणि त्यांची जबाबदारीही कर्तव्यनिष्ठेने पार पाडते. तसेच बाईंच्या घराशेजारी राहणारी मुलगीही अशीच वस्ताद होती. ती तिन्ही भावंडांना पुरून उरते. 'गया ' ही स्त्री सर्वांशी तोंड भरून बोलते. सर्व महत्त्वाची कामे ती स्वतः करते. 'बजाबाई' या विधवा स्त्रीने आपल्या भावांचा संसार यशस्वीपणे सांभाळला आहे. तिने घरात आपल्या कष्टाने, प्रेमाने, खंबीरवृत्तीने अधिकार मिळवलेला आहे. एकंदरीत सर्व जातीत, सर्व महाराष्ट्रभर आढळणाऱ्या या गौर्या इरावती बाईंचे मन वेधून घेतात. या गौराया इतरांना जपतात, त्यांची काळजी घेतात. आपल्या कष्टाने इतरांना प्रिय ठरतात. आपल्या मनातील दुःख पचवून यशस्वीपणे जीवन जगतात. अशा या स्त्रियांचा इरावती बाईंना अभिमान वाटतो .


5. स्त्री राज्य : - स्त्री आणि पुरुष हे दोघेही एकमेकांच्या जीवनातील अपरिहार्य असे घटक आहेत. यापैकी एक जरी नसला तरी जीवन अधुरे राहते. ती एकाच रथाची दोन चाके मानली जातात. यापैकी एखादा घटक जरी एखाद्या कुटुंबात नसला तरी त्या घरचे वातावरण बदलून जाते. इरावती बाई एकदा त्यांच्या मैत्रिणीच्या घरी जातात. त्यांच्या घरात एकही मोठा पुरुष नसतो. तेथे सर्वच स्त्रिया असतात. तेव्हा त्या घरातील वातावरण कसे होते, संबंधीच्या आठवणी या लेखात त्यांनी मांडल्या आहेत . त्या मैत्रिणींचे यजमान परगावी नोकरीला असतात. त्यांच्या घरात सर्वच स्त्रिया राहत असतात. त्यामुळे घरातल्या सर्व खोल्यात टापटीपपणा प्रकर्षाने जाणवत होता. पुरुषी धांद्रटपणा कोठेच नव्हता. त्या बायकांमध्ये भरपूर जेवणारही कोणीच नव्हते. त्यामुळे स्वयंपाकही भातुकलीतल्या जेवणासारखा वाटे. त्या घरातील सर्वच मुले छान, हुशार परंतु गुंड होती. त्यांच्यात सतत, भांडणे मारामाऱ्या व्हायच्या. घरातल्या बायका या मुलांची भांडणे मिटवायच्या. परंतु त्यांच्या गोड आवाजाला ही मुले अजिबात भीत नसत . त्यामुळे अर्थातच त्यांचे बोलणे निरुपयोगी ठरत असे. थोडक्यात बऱ्याच ठिकाणी पुरुष माणसे घरात नसतील तर घरचे वातावरण कसे बदलते, यावर प्रकाश टाकणारा हा लेख आहे .

6. परिपूर्ती : स्त्री जन्माची खरीखुरी ओळख . प्रस्तुत लेखात इरावती कर्वे यांच्या एका आगळ्याच मनोव्यथेचे दर्शन घडते. इरावती बाई येथे एका समारंभातील प्रमुख व्याख्याता असतात. त्यांचा कुणीतरी परिचय करून देत असते. हिरावती बाई या परिचयाकडे विलक्षण अलिप्ततेने पाहत त्यांची अर्थपूर्णता जोखू लागतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येते की, त्यांचा एक कन्या, एक स्नुषा, एक पत्नी म्हणूनच इतरांच्या प्रसिद्धीच्या प्रकाशातील एक व्यक्ती म्हणून परिचय करून दिला जात आहे. स्त्री ही कितीही कर्तबगार असली तरी तिला जीवनात स्वतंत्र अस्तित्व कसे नाकारले जाते व हे नाकारणारी व्यक्ती पुन्हा एक स्त्रीच कशी असते हे जाणवून लेखिकेचे मन उदास होते.' एकदा लग्न उरकून टाकले म्हणजे जबाबदारी सुटली ' असे सतत उद्गार काढणारे वडील आठवून ते अस्वस्थ होतात. स्त्रीची ओळख एक कन्या म्हणून होत असली तरी पित्याने मात्र तिला डोक्यावरचे एक ओझे मानावे ही वेदना त्यांना असह्य होते. पुढे त्या अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तबगारीचे गुणगान गातात. आपण आपल्या मामांजीच्या मोठेपणाचे ऋणी आहोत ही जाणीव उगाचच त्यांच्या मनात घर करू लागते. तोच परिचय त्यांच्या पतीविषयी सांगितले जाते. लेखिका आपले भाषण संपविते आणि घरी परतते. एक स्त्री म्हणून त्यांचा परिचय अधुरा असल्याचे त्यांना जाणवत राहते. एके दिवशी संध्याकाळी रस्त्यावरून घाई घाईने जात असता तिला एका मुलांच्या घोळक्यातील शब्द ऐकू येतात, '' पाहिलंस का ? ती बाई जाते ना, आपल्या वर्गातल्या कर्वे याची आई बरे का ' त्यादिवशी आपली बाईंनी सांगितलेली ओळख आज पुरी झाली. 'स्त्री' ला देवता मानणाऱ्या भारतीय सुसंस्कृत समाजाची तिच्याकडे पाहण्याची दृष्टी प्रत्यक्ष किती कोती, अनुदार व विसंगत आहे या वरील परिपूर्ती हे एक उत्तम भाष्य मानावे लागेल.

Comments

Popular posts from this blog

कुंडलिनी योग

मराठी भाषा आणि आधुनिक तंत्रज्ञान

चर्चबेल - ग्रेस