कुंडलिनी योग

  कुंडलिनी योग

           


योगाचा उद्देश साधनेतून मोक्ष मिळवणे हा आहे. आपल्या शरीरात जी चित् शक्ती आहे तोच परमतत्त्वाचा अंश म्हणजेच जीवात्मा असे उपनिषदे सांगतात .त्या आत्म्याचे परमात्म्याशी म्हणजेच शक्तीचे शिवाशी किंवा ब्रम्हाचे परब्रम्हशी मिलन, त्यात लो प पावणे म्हणजेच मोक्ष , त्याचा मार्ग योगशास्त्र सांगते. यासंबंधी चर्चा करताना महर्षी पतंजली सुद्धा सांगतात ,"तो परमात्म्याचा अंश म्हणजेच आपल्या शरीरातील चेतनाशक्ती आहे .श्रुती तिलाच प्राण म्हणतात, तो मनाच्या संकल्पाने शरीरात प्रवेश करतो. तो प्राण आनंदस्वरूप ,अजर, अमर व प्रज्ञात्मा आहे. तेच ब्रह्म होय ! कारण हा आत्मा ब्रम्हातून उत्पन्न होतो. सर्व सृष्टी त्याच्यात लय पावते व त्याच्यातूनच निर्माण होते. हे सर्व जगत त्याच ब्रम्हातून निसृत झालेल्या प्राणाचे स्पंदन होय !

माणसामध्ये असलेल्या या ब्रम्हाला म्हणजेच प्राणाला किंवा आध्यात्मिक शक्तीला , कुंडलिनी असे म्हणतात .तिचा आकार सर्पाकृती आहे . सृष्टीची उत्पत्ती झाल्यावर जी शेष शक्ती राहिली , तीच माणसामध्ये कुंडलिनी च्या रूपाने वास करते आणि म्हणूनच ब्रम्हांड व पिंड धारण करणारी ती शक्ती एकच आहे आहे. योग्यांना तिची माहिती आहे. परमेश्वराशी तादात्म्य पावण्याचे तिच्यात सामर्थ्य आहे. म्हणूनच ज्ञानी तिच्या मूलाधार या स्थानापासून तिला भूमध्यापर्यंत संचलित करतात .यालाच शक्तीचालना' ( कुंडलिनीला जागृत करणे )

म्हणतात.


योगशास्त्रात या कुंडलिनीला जागृत करून तिची सुप्त शक्ती जागी केल्यावर हळूहळू मायेचे बंध तुटू लागतात. व ते सर्व गळून पडल्यावर मुक्ती मिळते ; असे प्रतिपादन केलेले आहे .मोक्षप्राप्ती तिच्या जागृतीतून होत असल्यामुळे योगसाधनेत तिलाच महत्त्व आहे. इतकेच नव्हे तर योगाचा मूळस्तंभ कुंडलिनीचे उत्थान हाच होय! तिच्याच आश्रयाने सर्व ज्ञान साध्य होते. जागृत शक्तीशिवाय दुसरे कोणतेच साधन योगाभ्यासात प्रगती व समाधी सिद्ध करू शकत नाही.

परिश्रम न करता सर्व योगांची आधारस्त कुंडलिनी शक्ती , शक्तिपाताने जागृत होते. सद्गुरूच्या दृष्टीचा कृपाप्रसाद, म्हणजेच शक्तिपात , त्यामुळे गुरूच्या शक्तिपातातून , शिष्यातील शक्ती जागृत होते . यामुळेच योगात शक्तिपातयोग व त्याच्या अनुषंगाने सद्गुरु चा महिमा यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

'हटयोग प्रदीपिकेत 'असे म्हटले आहे की , 'पृथ्वीला ज्याप्रमाणे शेषाचा आधार आहे त्याचप्रमाणे योगशास्त्राच्या सर्व ग्रंथांना 'कुंडलिनी' हाच एकमेव आधार आहे'.

कुंडलिनी शक्तीची ईश्वरी, कुंडली ,बालरंडा, अरुंधती ,भुजंगिनी आणि परमेश्वरी ही पर्यायवाचक नावे आढळतात.

कुटिलाड़ग़ी कुण्डलिनी भुजंड़गी शक्तिरीश्वरी ।

कुंडल्यरुन्धती चैतल्यशब्दाः पर्यायवाचकाः।

                   हठ प्रदिपिका ३-१०३



इडा भगवती गङ्गा पिड़गला यमुना नदी ।

इडापिड़गलयोर्मध्ये बालरंडा च कुण्डली ।।


                     हठ प्रदीपिका ३-१०९


( अर्थ - डाव्या बाजूने श्वास घेणारी इडा नाडी , भगवती गंगेप्रमाणे उजव्या बाजूने श्वास घेणारी पिंगला नाडी यमुना नदी प्रमाणे असून इडा- पिंगला या दोन्हीमध्ये बालरंडा कुंडलिनी असते )

या शक्तीला तैजसी- शक्ती, जीवशक्‍ती, कुटिलांगी आणि सर्पिणी अशीही नावे आहेत.

मानवी शरीरात लिंग व नाभी यांच्या दरम्यान चार बोटे रुंद असा मऊ, पांढरा, वस्त्राने झाल्याप्रमाणे दिसणारा एक कंद आहे.


ऊर्ध्व वितस्तिमात्रं तु विस्तारं चतुरंगुलम् । मृदुलं धवलं प्रोक्तं वेस्टीताम्बरलक्षणम् ।।   


                      हठ प्रदीपिका ३-११२

ह्या कंदाच्या वर आणि मेरुदंडाच्या खालील भागातील मुलाधार चक्रात वेटोळे घातलेल्या सर्पिणीसारखी अमूर्त स्वरुपात कुंडलिनी वास करते. ती वर्तुळाकारात असल्याने तिला कुंडलिनी असे संबोधले जाते . ( घेरण्ड संहिता ,६-१३-१८ )

  शिवसंहितेत कुंडलिनी शक्तीच्या स्वरूपाचे विस्तृत विवरण आहे.


गुदद्वारापासून दोन अंगुळे वर आणि जननेंद्रियांपासून एक अंगुळ खाली , चार अंगुळे परिमाणयुक्त एक समकोन कंद आहे. गुद आणि जननेंद्रियाच्यामध्ये योनि स्थान असते . त्यामध्ये पश्चिमाभिमुख कंद आणि कंदामध्ये कुंडलिनी शक्ती वास करते . ती आकाराने कुटिलाकृती आणि सर्व नाड्यांभोवती साडेतीन वेटोळे घातलेली व सुप्तावस्थेत असून स्वयंप्रभेने प्रकाशमान आहे . ती शेपटीला मुखात धरून सुषुम्ना नाडीच्या विवरात स्थित आहे. ती बिजसंज्ञक वाणीची देवता आहे. ती सत्त्व , रज , आणि तम या तीन गुणांची जन्मदात्री आहे . ( शिवसंहिता , पंचम पटल - ७७-८१ )

जाबालदर्शनोपनिषदानुसार कुंडलिनी शक्ति ही पृथ्वी , जल , अग्नी , वायू , आकाश , मन , बुद्धी ,आणि अहंकार अशा प्रवृत्तींनी युक्त आहे . ( ४.११ )


तांत्रिक मतानुसार कुंडलिनी शक्ती प्रत्येक जीवात प्रसुप्तावस्थेत राहणारी परमेश्वराची पराशक्ती आहे.

विवेकमार्तंड ग्रंथानुसार कुंडलिनी कमल दंडा सारखी असून ते शुभ फल देणारी आहे.

मूलाधार चक्राच्या ठिकाणी मेरुदंडात किंवा पाठीच्या कण्यात ती वास्तव्य करून आहे. तेथूनच ती आपले शरीर तोलून धरते. तेथे जो कंद आहे आहे तोच स्वयंभू लिंग होय ! 'हटयोग प्रदिपिकेत' , 'घेरंड संहितेत' व 'शिवसंहितेत' कुंडलिनी चे स्थान बस्ती प्रदेशात असलेल्या अंडाकृती कंदाच्या मध्यभागी आहे, असे सांगितले आहे.ही शेष शक्ती तेथे लिंगास साडेतीन वेढे देऊन आपल्या तोंडात आपले पुच्छ घालून निद्रिस्त आहे . वरील कंद आकाराने गोल आहे. गुदेच्या वर दोन अंगुळे व लिंगाच्या खाली दोन अंगुळे अंतरावर चार अंगु ळांच्या प्रमाणाचा हा कंद आहे. तेथे सुषुम्ने च्या द्वारी कुंडलिनी निद्रिस्त असते. वंश रज्जू च्या खालच्या टोकाचे ठिकाणी ब्रह्म नाडीचे द्वार आहे. तिच्यावर एक स्नायू पटल आहे, तोच हा कंद ! तो शरीरातील सर्व नाड्यांचे मूळ आहे . तेथूनच ७२००० नाड्या विस्तार पावतात . तो कंद गोलाकार आहे . एखाद्या पक्षाच्या अंड्याच्या आकारासारखा व त्याच्या कवचाप्रमाणे मऊ पांढरा आहे . त्यात कुंडलिनी बंदिस्त केलेली आहे .ती उथ्थित झाली की , गतिमान होते. आणि रज्जू मधून सुषुम्ने मधून आपला मार्ग आक्रमून थेट सहस्त्रारत पोचते व साधकास मोक्ष प्रदान करते.


या कुंडलिनी संबंधी शास्त्रकार असे म्हणतात की , "इडा व पिंगला ही दोन कुंडले जिला आहेत, ती कुंडलिनी".

ही विश्व उत्पन्न करणारी व धारण करणारी कुंडलिनी विश्व चैतन्याच्या शक्तीची व्यक्तिगत शारीरिक प्रतिनिधी आहे . ही जेव्हा सर्वश्रेष्ठ शिवाच्या चैतन्यात विलीन होते, त्यावेळी विश्व विरघळते , मावळते व साधकाला अंती मुक्ती मिळते.

मनुष्याच्या देहात पाठीमागच्या भागात मेरुदंड आहे. त्याच्यामध्ये सुषुम्ना आहे. ती धोत्र्याच्या फुलासारखी आहे . तेथूनच मूलाधारा पासून निघून ती वर सहस्त्रारात गेलेली आहे. सुषुम्नेच्या आत वज्रनाडी आहे. ती सतत एखाद्या दिव्याप्रमाणे जळत असते .परत तिच्या आत चित्रीणी नाडी आहे. ती कोळ्याच्या जाळ्या प्रमाणे सूक्ष्म आहे. याच चित्रिणी नाडीमध्ये म्हणजेच ब्रह्मनाडी मध्ये (कारण तिचे ब्रम्हनाडी हे दुसरे नाव आहे ) एखाद्या माळेप्रमाणे षटचक्रे व इतर चक्रे आहेत. सुषुम्ना नाडी आत्मज्ञान देणारी नाडी आहे . हीच मोक्षाचे प्रधान साधन आहे. चित्रिणी नाडीच्या आरंभाला 'ब्रम्हद्वार' असे म्हणतात. याच द्वारातून देवी कुंडलिनी ऊर्ध्वगामी होण्याकरता प्रवेश करते.

व्यासाभाष्या त सुषुम्नेच्या द्वारी निद्रिस्त असलेल्या कुंडलिनी ला 'कूर्मनाडी'असे संबोधले आहे.

देहाच्या मागील भागात मेरुदंडाच्या बुडाशी कंद , त्यात साडेतीन वेढे घालून बसलेली कुंडलिनी , त्याच कंदाच्या वर लगेच सुषुम्ना नाडीचे तोंड म्हणजेच ब्रह्मरंध्र , कुंडलिनी जागृत झाली, की वेढे सोडवून ब्रह्मरंध्रातून सुषुम्नेच्या आतील वज्रा व तिचे आतील चित्रणीतून षटचक्रे भेदून सहस्त्रारात पोहोचते व साधकास मोक्ष प्रदान करते. व वज्रिणीचे कवच पांढरे व टणक आहे, तर चित्रिणी धूसर आहे. चित्रा नाडीमधील चेतनिक केंद्रे म्हणजेच चक्रे होत . ती एकमेकांस सूक्ष्म शक्ती प्रवाहात जोडलेली आहेत . त्यांनाच 'नाडी' असे म्हणतात.


सुषुम्नेतून कुंडलिनीचे ऊर्ध्वमार्गे चालन सुरू झाले की, ती षटचक्रांचा भेद करून वर सहस्त्रारातील शिवतत्वाकडे जाऊ लागते . त्यावेळी साधकाला तिची कित्येक मानसिक व शारीरिक चिन्हे स्पष्ट होतात. तिच्या गूढशक्तीचा आविष्कार होतो. शारीरिक क्रिया आपोआपच होऊ लागतात. मुलबंध ,उड्डियान बंध ,जालंदर बंध वगैरे आपोआप लागतात .तिच्या जोरामुळे साधकाला आपोआपच धक्के मिळत असतात. त्यावेळी त्याला अपूर्व असा आध्यात्मिक जागृतीचा आनंद मिळतो. मेंदू , डोके जड होते. व मग साधकाला अनेक प्रकारचे अनुभव येतात. त्यावेळी प्राणशक्ती स्थिर होते. मग लय लागतो व प्राण आज्ञाचक्र गेला, की मनोलय होतो. त्यावेळी संकल्प विकल्प विरहित मनाची केवळ एकाग्रताच होते. त्याचेवर सहस्त्रार आत राजयोग सिद्ध होतो.


Comments

Popular posts from this blog

मराठी भाषा आणि आधुनिक तंत्रज्ञान

चर्चबेल - ग्रेस